- श्री. भामरे बापू
॥ आकाशी झेप घ्या रे लेकरांनो ॥
==========©MK भामरे.बापु
हो खरच..,.
आंतर्राष्र्टीय समस्यांवर चर्चाकरतांना हे दोन तरुण
गौरव व गजानन..
काय बरे चर्चा करत असतील हो हे?
भडकणार्या महागाईची?
राजकारणाच्या अवमुल्यनची?
ग्लोबल वार्मिंगची?
की ढासळणार्या मुल्यांची?
नाही..!
मग?
स्वतःच्या लग्नाची?
आपल्या करीअरची?
संसाराची?
की
तारुण्य सुलभ प्रेमाची,लव्ह लेटर्सची ,भटकंतीची?
छेः…
अजिबात नाही हो..
ते मस्त पैकी आपल्याच विश्वात गुंग आहेत..
गजानानः तु जजजजजजजजजेजजेजेज जेवला का रे?
गौरवः नाही रे माझे पप्पा जेवु घालतील..
गजाननः तुतततततु माझ्याझ्या गावावावाला येतोतो का रे?
गौरवः नाही भौ,,माझी मम्मी रागवेल…बघ रे त्या अमोलने माझे नाव घेतले.त्याला मार ते…
गजाननः हो हो तुतु कटींग का केकेलीली नाही..
गौरवः स्टॅंड वर चालतो का?
गजाननः .ननही भो..
गौरव ः बघ रे त्या ईस्तरीवाला केलासने माझे नाव घेतले..त्याला मार ते..
गजाननः हुं हुं हुं हुं
गौरवः मला भरपुट झाले रे.कापुन टाकं
गजाननः हं हंहंहं काकापुपुपुपुन टाटाटाककक…
अशा या गप्पा रंगल्यात हो..
मध्येच हसायचे मध्येच काहहीतरी बोलायचे,,
दोन्ही ही दिव्यांग..मतीमंद..गतीमंद
निसर्गाने जसे बनवले तसे आनंदाने जगणारे..
आपल्या आईवडीलांवर पुर्णपणे विसंबुन असणारे.
आपलं छोटसं विश्व..
ना उॅंची उडाण
ना उंचे सपने
सारी दुनिया से
क्या लेना
क्या देना
सिर्फ माॅं बाप अपने
असं या दिव्यांगाचं जीवन.
जगाची फिकीर नाही..
जीवनाची तमा नाही.
स्वप्न नाही,भविष्य नाही
आपलं छोटसं आस्तित्व घेवुन जगणारे,,
ना लालसा पैशांची
ना हाव सत्ता संपत्तीची
पर्वा नाहीच त्यांना
दिव्यांग अवस्थेची
घार हिंडते आकाशी
चित्त तिचे बाळापाशी
या उक्तीप्रमाणे त्यांचे आई बाप सदैव त्यांच्यावर लक्ष ठेवुन असतात..याची जाणीव त्यांना असावी वा नसावीच.
पण त्यांच्या आईबापाला?
याचे उत्तर शब्दातित आहे.
ते काहीही असो हो
पण हे दोन दोस्तारांचा एकमेकांशी चाललेला संवाद पाहुन त्यांचे आईबाप मात्र खुपच सुखावले आहेत.
त्यांच्या लेखी खरच त्या वर नमुद केलेल्या गप्पा मारताहेत अस्सच वाटतय,,
कशाका असेना..
वेड्या वाकड्या का असेना..
तर्कसंगत का नसेनात..
पण ते गप्पा मारताहेत,
एकमेकांच्या पाठीवर हात ठेवुन कौतुक करीत आहेत..
एकमेकांना धीर दिलासा देत आहेत,
“स्वतः असहाय असलो म्हणुन काय झालं रे,पण मी तुझ्या पाठीशी आहे,।”
अशी हिमंत देताहेत.
अहो जे चांगली मुलंही करणार नाहीत ते काम आपले लाडके बालकं करताहेत याचा आभाषी का असेना, आनंद या मायबापाला आहे.
ही ,आणि ..बालके?
असं कसं हो?
हा सुज्ञ जगाचा सवाल,
पण पस्तीशीच्या घरातले हे तरुण त्यांच्या आईबापांसाठी तरुण बालकेच..
हो,,य,,
बालकेच !
कारण ती बालकेच आहेत.निरागस..निर्मळ..निरपेक्ष..निःस्वार्थ.. आणि निर्भेळ असे ..
पुर्णतः ब्रह्मचारी,,
त्यांच्या गप्पाही तशाच
नि रा ग स
पण मायबापांसाठी आपल्या लेकरांच्या गप्पा या आंतर्राष्र्टीयच
व करीयरच्याच..
आकाशात झेप घेण्याची ऊर्मी दाटलेले त्यांचे डोळे,
आयुष्यात काही तरी बनण्याची त्यांच्या मनाची तयारी..
पण निसर्गाने त्यांच्या रथाची चाके विकलांगतेच्या गर्तेत फसवलेली..
अशावेळी साथ शोधली आहे त्यांनी एकमेकाची..
अशी बालकं पोटी येणं म्हणजे आमचे पाप का हो?
पुन्हा सुज्ञ जगाचा सवाल,,
पण नाही हो मंडळी..
हे आमचं कुठल्या जन्माचं पाप नाहीच..ऊलट आमचं ते पुण्याचं फळ आहे,
आम्ही भाग्यशाली,,
आमच्या पोटी ही पोरं जन्माला आली,
या पोरांचा सांभाळ कोण बरे करेल?
हा निर्मात्या भगवानला प्रश्न पडला असावा,
यासाठी सहनशील,न चिडणारे,गपगुमान सोसणारे आई बाप कोण असतील? याचा शोध देवाने घेतला असेल.त्या शोधांती देवाच्या परीक्षेत आम्ही मारबाप ऊतरलो असणार,.
केवढं हे भाग्य मंडळी!
या लेकरांचा सांभाळ आम्ही शिक्षा म्हणुन का करावा?
ते फळ म्हणुन आनंदाने तो करावा.
मतीमंदांसोबत जगतांना मनाच्या आरोह अवरोहाचे तरंग मोठे विचित्र असतात.
आईबापच ते जाणतात.
कितीही मनाचा मोठेपणा दाखवला तरीही शेवटी ती ही हाडामांसांची माणसच!
त्यांनाही भावनांचा उद्रेक दाटतो,
“काश! आपलीही पोरं सुदृढ असती तर !”
अशा विचारांनी तीही भावूक होतात.
पण वेदनांचे वेद करायची कला अंगीकारुन ते आनंदी दिसतात.
मतीमंदां सोबत जगण्यातही वेगळीच मजा असते.
आम्ही तर आमचे मिशनच करुन घेतले ते मतीमंदांसोबत,दिव्यांगा सोबत,अनाथांच्या सोबत राहण्याचे.
वेगवेगळ्या माध्यमांनी त्यांना आनंद देणे,लोकांचे वाढदिवस त्यांच्या सोबत साजरा करणे,दिवाळी दसरा त्यांच्यासह मनवणे,
नरक चतुःर्दशी ला त्यांना अभ्यंग स्नान घालणे यात जो आनंद मिळतो तो आगळा वेगळाच.
म्हणुन आम्ही सर्वांना नेहमी आवाहन करतौ,
की निर्मिकाने आम्हाला सुदृढ घडवले हीच त्याची मोठी देन..
ही देन दिव्यांगासाठी वापरावी.
“भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे”
ही स्वामी समर्थांची साथ मनाला हुरुप देते,चैतन्य देते.
तसेच आपणही दिव्यांगाच्या सोबत जगलं पाहीजे.त्यांच्या मनाला हुरुप येईल असा व्यवहार केला पाहीजे.
त्यांच्या मनाचे बूरुज ढासळायला लागतात तेंव्हा आपल्या प्रेम,सहानूभूती,सहकार्य,दिलासा,सहारा च्या फुंकरी मारल्या पाहीजेत.
वाचकहो,
ही एक सत्य गोष्ट आहे.पण ती लिहु नका असे बायकोने बजावले आहे,”ऊगाच आपल्या वेदना दुसर्यांना सांगु नये”असे तिचे व्यवहारी मत आहे.
पण आनंद जसा वाटल्याने द्विगुणित होतो तसेच वेदना ह्या दुसर्यांना सांगण्याने कमी होतात असे माझे अव्यवहार्य मत आहे.
म्हणुन तिचा राग पत्करुन ही गोष्ट लिहिली आहे
नाम मे क्या रख्खा है?
असं सर्व जण म्हणतात.
पण नाही हो…
नाममे बहोत कुछ होता है हां..
ते असं झालं…
आमचा एकुलता एक सुपुत्र गौरव जेवणच करत नाही.
(फीटच्या गोळ्यांमुळे भुक मंदावते व कधी मती मंदत्वाची लहर म्हणून)मग
जीवन जगण्यासाठी त्याच्या पोटात दोन घास पडायलाच हवेत व शरीराला आवश्यक ते व्हिटॅमिन्स मिळायला हवेत म्हणुन आम्हा उभयतांचा प्रचंड अाटापिटा चालतो.
आम्ही जेवायला बसतो तेंव्हा त्याला आग्रह करतो.पण तो जेवतच नाही.
मग केंव्हातरी हळुच त्याच्या तोंडुन
“मला खायला काय देते?”
असा शब्द निघाला रे निघाला की आमच्या आनंदाला पारावर नसते,
आम्ही लगेच किचन मध्ये धावाधाव करतो.
कारण केंव्हा त्याची भुक मरेल वा केंव्हा मुड बदलेल हे सांगता येत नाही.
म्हणुन पडत्या फळाची आज्ञा समजुन
ड्राय फ्रुटस् ,फळे,चिवडा वगैरे देतो.पण त्याला ते आवडत नाहीत.मगआम्ही फटाफट कांदे चिरतो,बटाटे चिरतो,लसुन निवडतो..गॅस पेटवतो
आणि हातघाईच्या लढाई सारखं
फट्कन कधी आमलेट,कधी भुर्जी,कधी पाथरा,कधी भेळ,कधी पोळी काला,कधी खमन असे मेनु बनवतो.
त्याला ताटात गरमागरम परसतो.
पण तेवढ्यात त्याचा मुड जातो.
“मला नाही काहीच खायचं…”
असं म्हणुन नकार देतो,
आम्ही घास धरुन त्याच्या तोंडात टाकण्याचा कसोसीने प्रयत्न करतो.
गाणे म्हणतो,गाडीवर फिरण्याचे,गावाला जाण्याचे आमिष दाखवतो,
पण तो ढिम्म्..
“तुच खा…मला नाही खायचं”
हा पाढा म्हणतो,
मघापासुनची आमची धावपळ व काळपात सर्व वाया जाते.
सारा ऊत्साह मावळतो,तो जेवला नाही म्हणुन आमच्याही पोटात तो मेनु जात नाही..
चिवडा,शेव,फरीयाली,काजु,बदाम,मनुख,शेंगा,बिस्कीट,चाॅकलेट,केळ,सफरचंद,चिकु, देवु करतो.पण तो खात नाही.
पुन्हा चार सहा तासात तो विचारतो.
“मला खायला काय देतात?”
मग आम्ही एकेक नाव विचारतो.
वडा?भजी?पाथरा?सोयाबीन?भुर्जी?आम्लेट?…..
खुप खुप..
पण त्याची नकार घंटा सुरुच.
आणि आमची घालमेल..
मग पुन्हा तो विचारतो.
“मला काय देतात?वेगळं काही तरी करा पप्पा”
आम्ही पुन्हा हाॅटेलातील वेटर सारखं एकेक मेनु विचारतौ.
शेवटी यादी संपते पण त्याचं
“वेगळं काहीतरी”
असं पालुपद सुरुच.
आत्ता नावं सांगुन सांगुन तरी काय सांगणार हो?
मग
एगप्लेट,दो टांग,व्हिट चिली,चिली वाटर,टनवांगी, हेप्पो,आर्जीभु, जीभं,डावप्लेट
अशी चित्रविचित्र व जगाच्या पाठीवर कुणालाच ज्ञात नसलेले मेनु सांगतो.
बायको हताश होवुन उदास होते,
पण असं हिंमत हारेल तो मी कसला?
वेदनांच्या काळ्याकभिन्न मजबुत खडकांना हास्याच्या मुलायम काचांनी फोडण्याचा प्रयत्न करण्यात माहीर असलेला वेडापीर…
मी चटणी पोळीला व्हिट चीली म्हणतो,खुड मिर्चीला चिलीवाॅटर संबोधतो,कांदा भजी ला ओनीनय पिझ्झा सांगतो,भाजी भाकरीच्या काल्याला काॅंटीनेंटल बाजरा ब्रेड म्हणतो.,
जेणेकरुन ती नावे ऐकुन त्याची भुक चाळवावी.व एकादा पदार्थ मागावा,
तो नकार,कच् कच्,नाही,नको,मला नको..अजुन दुसरं सांगा हे सुरु ठेवतो.हळुच मग
एकादं नवं नाव सांगतो.
“हेप्पौ जॅपॅनीज”
ते नाव ऐकुन तो तयार होतो.
मग आम्ही हेपो म्हणजे पोहे बनवतो व ते हेप्पौ म्हणुन खावु घालतो.
लढाई जिंकल्याचा आनंद होतो.
हे रोज दोन्ही वेळचे प्रश्न..
आज त्याने आळु वडी ची फर्माईश केली.
आम्ही फटकन बनवायला घेतली.डाळीचं पीठ भिजलं,आळुच्या पानावर पसरवलं,ते उकळत्या पाण्याच्या वाफेवर ठेवले.
“उरकवा पप्पा ,मला भुक लागलीय”
त्याचा रट्टा..
आम्ही गॅस वाढवला.त्याचा मुड व भुक आहे तो पर्यंत आळुवड्या व्हाव्यात म्हणुन उतावीळ,,
शेवटी कसं तरी भांडं उतरवलं,वड्या कापल्या
आणि ताट धरुन त्याला वाढणारच तेवढ्यात त्याला फीट येते,त्याच्या पाय झटकण्याने आळुवड्यांचे ताट फिरकवले जाते.घरभर वड्याच वड्या.,
आम्ही त्याचे डोळे झापतो.पालथं झोपवतो.
थोड्या वेळाने फीट ओसरते.शरीर कंप पावत असते.
पुन्हा आम्ही त्याच्या उपाशी पोटाकडे पाहत सुन्नं बसतो,
पुन्हा ४/६ तासानंतर तो हळुच विचारतो.
“मला काय करुन देतात?”असं विचारतौ.
“थांब बेटा तुलााआळुवड्या देतो हां”
तसा तो म्हणतो.
“नाही आळुवड्या नको..दुसरं …दुसरं..काही तरी करा”
आता दुसरं काय करणार?
मग आयडीया करतो.
“अरे आळु वड्या नको का? मग असं करु या ड्यावळुआ करु?”
ते नवीन नाव ऐकुन त्याला कुतुहल जागतं.मग आम्ही त्याच वड्या त्याला खावु घालतो. मेनु तोच पण नाव बदलल्याने तो खातो.
आळुवड्या खात नाही ना, मग ड्यावळुआ खा. अशी आयडीया करतो.ते वेगळे नाव पाहुन तो बिच्चारा निरागस ते खातो.केवढे सामर्थ्य असते नावात नाही का?
आमची आयडीया यशस्वी होते.
त्याच्या पोटात दोन घास जातात नि आमच्या मनात समाधान,,
केवळ नाव बदलल्याने,,
म्हणुन म्हणतो नाम मे भी सबकुछ है भैय…
त्याचच कशाला हो?
आम्हा चांगल्या माणसांचीही हिच तर गोष्ट असते.
नावावर सर्व चालतं.
नावावर खपवतो.
नावाला भुलतो.
नाव गाजवतो,
नावाची मार्केटींग करतो.
नावापुरतं काम करतो.
नाव ठेवतो.
नाव काढतो,
नाव घेतो.
नाव रुपाने ऊरतो.
म्हणुन तर म्हणतो,
छकुबस मे मना..
(नाम मे सबकुछ)
एका कार्यक्रमप्रसंगी आम्ही या पोरांची अशी साथ आम्ही टिपली कॅमेर्यात..
त्यांचे हे भेटणं कौतुकास्पदच..
अशा लेकरांचे मायबाप झाल्याशिवाय ते कुणाला कसं कळणार?
पण आम्हाला ते कळले .
आम्हाला त्यांच्या स्वप्नांना सत्यात उतरवायचे आहे.
जीवनाच्या या चक्काचौंद जीवघेण्या स्पर्धेत त्यांना उतरावयचे आहे.
कोण म्हणतं ते या स्पर्धेत टिकणार नाहीत..
छेः
ते टिकतीलच..
त्यांच्या त्यांना न कळणार्या दुर्देम्य ईच्छांना आम्हाला मुर्त रुप द्यायचे आहे.निदान त्या आभासी आशेवर तरी आम्हाला जगण्यासाठी हुरुप शोधायचा आहे.
कारण…
आम्ही त्यांचे
मा…य…बा… प
आहोत हो…….!