समृद्ध शिक्षण संस्कारांसाठी...!

शिक्षणयात्रीविषयी

समृद्ध शिक्षण संस्कारांसाठी…!

शिक्षणाचा केवळ साक्षर बनविणे हा मर्यादित हेतू नसतोच कधी.शिक्षण म्हणजे खुप काही असलं तरी शिक्षणानं माणुसपण जागलं जावं, आपल्या अंगभूत कलागुणांना संस्कारांची जोड मिळावी यासारख्या अपेक्षा या असणारंच! केवळ खुप शिकला म्हणुन कृत्रिम बडेजावापेक्षा माणुसकी जपणारी माणसं दिसली तर ठिक नाहीतर ” समृध्द ” शिक्षणाची उणीव भासते…असं का?

संस्कारी माणुस होणं हे महत्त्वाचे . व्यक्तीमत्व विकासाच्या प्रवासातील तो एक अत्यंत महत्त्वाचा घटक आहे . त्यातूनच व्यक्तिमत्व आकार घेत असते. त्याला एक नवी दिशा मिळत असते. व्यक्तिमत्त्वाची जडणघडण होऊन ते सर्वार्थाने आकार घेत असते. हा सारा प्रवास होत असताना सामाजिक परिस्थिती, होणारे संस्कार आणि शाळेतून मिळणारे शिक्षण या गोष्टी अर्थात खूप महत्त्वाच्या असतात.अशावेळी कर्त्या शिक्षकांचा…संस्कारी शाळांचा शोध घेऊन त्यांचं काम सर्वासमोर आलं पाहिजे,इतरांना प्रेरणा मिळायला हवी .या मौलिक विचारानं मा. पुरुषोत्तम भापकर (तत्कालीन शिक्षण आयुक्त) व शिक्षणयात्री परिवारातील सदस्यांचे चिंतन सुरू होतं. आणि या चिंतनातूनचं ‘शिक्षणयात्री’ मासिकाचा जन्म झाला.
शिक्षणासारख्या सृजनशील क्षेत्रात अनेक शिक्षक वेगवेगळ्या पद्धतीने अभिव्यक्त होताना आपल्याला दिसतात.काहितरी नवं करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. “आहे त्या परिस्थितीत,आहे त्या साधनांसह “…याप्रमाणं ते कधीही मागं सरत नाही.त्यांच्या उपक्रमांना,केलेल्या प्रयत्नांची दखल घेणं गरजेचं होतं. तसंच अनेक वृत्तपत्रातून,मासिकातून त्यांच्या अभिव्यक्तीला प्रयत्नांना मनाजोगे मांडण्यास मर्यादा होत्या.
तेंव्हा एक स्वतःच व हक्काचं. ” विचारपीठ” शिक्षणयात्री या मासिकातून शिक्षकांना मिळावं, त्यांच्या डोक्यातील शिक्षण क्षेत्रास उन्नत करणारे विचार, मुलांच्या शिक्षणात नवनवीन क्रांती घडवून आणणारे उपक्रम सर्व शिक्षक बांधवांपर्यंत पोहोचावेत आणि शिक्षणातील समृध्दी साधली जावी हा हेतू ठेवून शिक्षणयात्रीने गेली पाच वर्ष अनेक शिक्षण प्रवासी एकत्रित केले. छोटासा विचार घेऊन निघालेले काही शिक्षणप्रवासी आज शिक्षण यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यात आपले विचार रुजवत आहेत.
पाच वर्षात शिक्षणयात्री मासिकाने शिक्षण क्षेत्रातील अनेक उपक्रमशील शिक्षक व त्यांचे उपक्रम सर्वांपर्यंत पोहोचले. दरवर्षी एक सुंदर दिवाळी अंक व एक महिला विशेषांक काढून आपल स्वतःचं एक वेगळेपण सिद्ध केलं आहे. केवळ शैक्षणिक नाही तर सामाजिक पैलू असलेल्या विषयांना स्थान दिलंय.वंचितांच्या व्यथा समोर याव्या हा प्रयत्न देखील शिक्षणयात्री मासिकाचा आहे. प्रत्येक महिन्यातील मासिकाचे मुखपृष्ठ व आतील विषय सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आलेले आहेत.
सध्याच्या कोरोना काळातही शिक्षणयात्री ने कुठलंही किंतु-परंतु न वापरता नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून डिजिटल अंक तयार करून सर्वांपर्यंत पोहोचले ही एक शिक्षणयात्री मासिकाची स्वतःची उपलब्धी म्हणावी लागेल.
नवनवीन बदलांसह शिक्षणयात्री एका नवीन आकारात व नव्या धाटणीने आपल्या सर्वांपर्यंत पोहोचेल यात शंका नाही.
शुद्ध हेतू आणि शिक्षकांसाठीच अभिव्यक्तीपीठ म्हणून निर्माण झालेलं हे शिक्षणयात्री मासिक नक्कीच येत्या काळात सर्वांचं आवडतं होईल आणि एक शिक्षणासाठीची नवी उमेद आणि नव्या दिशा घेऊन “समृध्द शिक्षणासाठी”प्रवास करेल यात शंका नाही…