पुस्तकं गुणगुणतात
आईला आम्ही माई म्हणत असू.शिक्षा करण्याची माईची सवय जगावेगळी होती (हे आता जाणवतं!) खोड्या केल्या,चूक गंभीर असली किंवा शेजारपाजारच्या कोणी तक्रार केली तर पाण्यासाठीच्या एका पितळी पिंपात पाण्यात उभं राहण्याची आणि असं उभं असतांना म्हणजे,शिक्षा भोगताना एखादं पुस्तक मोठ्यानी वाचण्याची सक्ती असे.शिक्षेची मुदत संपण्याआत वाचन थांबलं तर शिक्षेच्या मुदतीत वाढ होत असे! यापेक्षा कठोर शिक्षा म्हणजे याचा पिंपात उभं राहून वीरकरांच्या डिक्शनरीतले शब्द पाठ करणे.एखादं अल्फाबेट माई सांगत असे आणि त्या अक्षराने सुरु होणारे इंग्रजी शब्द पाठ करणे हे अतिशय कंटाळवाणे असे.
अचानक पाठ केलेल्या शब्दातले काही शब्दार्थ माई डिक्शनरी हातात घेऊन रॅन्डम विचारत असे.त्याची उत्तरे देता आली तर शिक्षा समाप्त नाहीतर पिंपातल्या पाण्यात उभे राहणे आणि वीरकरांचे पाठांतर पुढे सुरु असा तो मामला असे! वाचनाचा पहिला संस्कार झाला तो असा.या जगावेगळ्या शिक्षेमुळे वाचन- पाठांतरावर लक्ष केंद्रीत करायची सवय लागला ती आजतागायत कायम आहे. जुन्या पुराण्या टाइम्स ऑफ इंडीया आणि एक-दोन दिवस शिळ्या असलेल्या मराठा तल्या दररोज 20 ओळी उन्हाळा आणि दिवाळीच्या सुट्टीत लिहिणे बंधनकारक होते. हे लेखन झाल्याशिवाय नाश्ता मिळत नसे आणि असं शुध्दलेखन व्याकरणदृष्टया अचून असले तर सातूच्या पिठात गुळाचा एखादा खडा किंवा एखादे बिस्कीट बक्षीस म्हणून अतिरिक्त असे.दासबोध,तुकाराम गाथा,कर्हेचे पाणी वगैरे वयाच्या बारा-तेरा आधीच वाचून झाली (कळली नाही तो भाग वेगळा.) शब्द केवळ अक्षरांचाच समूह नसतो,त्याला भावना असताना आणि शब्दातला धर्म किंवा जात नसते हाही संस्कार माईचाच. तो बालपणी झालेला. उमलतानाच जाणीव विकसित करणारा पुढचे आयुष्य समृध्द करणारा हा संस्कार केल्याबद्दल माई प्रति कृतज्ञता व्यक्त करायची की जन्म दिल्याबद्दल? इतका हा संपन्न संभ्रम आहे.
वाचनासोबत पाढे-शुभंकरोती काही स्त्रोत्र संध्याकाळी एकदम मस्ट होते.परवचा संपला की लगेच अलिफ बे साठी जावे लागे.मराठवाड्यात तेव्हा सर्वच भाषक शाळांत उर्दु शिकणे कंपलसरी होते.पण, ही सक्ती नंतर बंद झाली.कळत्या वयात डॉ.विनय वाईकर तसेच नारायण कुळकर्णी-कवठेकराची भेट झाल्यावर उर्दू शिकणं राहून गेल्याची सल आजही ठसठसते. परवचा आणि अलिफ बेमुळे उच्चार सुधारतात हाही संस्कार माईचाच( नंतरच्या काळात अभ्यास अवांतर आणि पत्रकारिता करतानाचे अपरिहार्य वाचन तसेच श्रावणात या सवयीचा विलक्षण परिणामकारक उपयोग झाला.सव्वादीड तासाचं भाषण किंवा एखाद्या तेवढ्या वेळात संपणार्या कार्यक़्रमाची कोणतेही टिपणं न घेता अचूक रिर्पोटींग करण्याची शैली पत्रकारितेत आल्यावर विकसित झाली ती याच संस्कारातून)पुढे मराठवाडा हे दैनिक,अनंतराव भालेराव,बाबा दळवी आणि पुन्हा माईमुळे वाचनाला दिशा आणि शिस्त लागली.या शिस्तीतून आणि ग्रंथालय शास्त्राचा अभ्यास करतांना शब्दांची गोडी लागली.शब्दाचा मुळार्थ (अभिधा),व्युत्पत्ती,उच्चार शास्त्र यांच्या वाटेवरचा प्रवास सुरु झाला तो आजही सुरु आहे. याचा एकत्रित परिणाम म्हणजे आजही लक्ष खूप केंद्रीत न करता वाचलं तरी खूपसं लक्षात राहतं.
वाचनाची जागा,वेळ,मूड वगैरे-नखरे तेव्हा नव्हते,आजही नाहीत.अलीेकडच्या 18-20 वर्षांत तर विचित्र सवय लागलीये.कार्यालयात एक,घरी दुसरे आणि कारमध्ये किंवा प्रवासात तिसरे अशा एकाच वेळी तीन पुस्तकांचे वाचन सुरु असते आणि महत्वाचे म्हणजे एकातून दुसर्याकडे वळताना संदर्भ तुटला असे काहीच होत नाही.सलग वाचन सुरु असल्यासारखी ही प्रक्रिया आपसूकच घडत जाते.हे कथन करताना हटके वाटतंय,पण अगदी सहज घडतं असं,तुटक तुटक तरीही सलग वाचन,ह ेमात्र खरं,आवडींन किंवा ओढीने खरेदी केलेलं पुस्तक लगेच वाचून होतं असं नाही.अनेकदा खरेदी केल्यावर अचानक वर्ष-सहा महिन्यांची ते पुस्तक हाक मारतं आणि मग वाचन सुरु होतं.काही पुस्तकांना हात लागण्यासाठी त्यापेक्षा जास्तच वेळ लागतो.
पद्मजा फाटक,दीपा गोवारीकर आणि विद्या विदवांस संपादित ‘बापलेकी’ वाचनासाठी तब्बल चार-साडेचार वर्षांनी मुहूर्त लगला, तर अरुणा ढेरेच्या ‘कवितेचच्या वाटेवर’ फिरुन यायला एकही दिवस लागला नाही.( हे पुस्तक आधीच हाती आलं असतं,तर इतक्या कविता वाचनात गेलेला वेळ अन्य वाचनासाठी सत्कारणी लागला नसता का?) नंदा खरेंच्या ‘कहाणी मानव प्राण्याची’ बद्दलही असंच घडलं. अच्युत गोडबोलेंच्या ‘अर्थात’ ने पदवीचं शिक्षण घेताना अर्थशास्त्राच्या अभ्यासातले ‘सेल्फ अॅक्च्युलायझेशन, चा सिध्दांत मांडणारा अब्राहम मॅस्टलॉव्ह वगैरे पुन्हा भेटले आणि लक्षात आलं अरे यांना तर आपण विसरलोच होतो की! अशात म्हणजे या आठ-दहा वर्षांत नॉट विदाऊट माय डॉटर,ब्लास्फेमी, एका साळीयाने ब्र आणि महत्वाचे म्हणजे मौनराग अशी काही पुस्तके मनात कायम मुक्कामाला आली आहेत.कधी कधी एकांतात ती पुस्तके गुणगुणाताहेत असंही वाटतं. पुस्तकांचं हे गुणगुणणं विलक्षण मेलोडिसस असतं,कधी ऐकलंय?
प्रविण बर्दापूरकर
9822055799