तस्मे श्री गुरुवे नमः
आयुष्यात भेटलेल्या प्रत्येकाला मी गुरुच्या रुपात पाहतो. प्रत्येकाकडून काहींना काही शिकण्या सारखे असते. त्याचेकडे जे चांगले आहे ते माझ्या पदरी घेण्याचा प्रयत्न नेहमीच राहतो.
या बरोबरच माझी कारकीर्द यशस्वी करण्यात आई, काकू, कुटूंब, मित्र, समाज या सर्वांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचे संस्कार, शिकवण या पाऊल वाटेवर मी चालत आलोय नि चालतोय !
आमची परिस्थिती जेमतेम होती. तीन/चार वर्षाचा असतानांच वडील देवाघरी गेले. नंतर प्रमुख असलेले काका सुध्दा वारले. माझा सांभाळ आई (जावत्राबाई) बरोबर आई समान असलेल्या काकू (वणूबाई महाजन) यांनी केला. दोघांचेही माझ्यावर संस्कार आहेत शिकवण आहे. भावी जीवनाची संस्कारी मुळं आईनेच माझ्यात रुजवली. खोटं बोलायच नाही, चोरी करायची नाही.कष्टाचंच खावं, कुणाचंही भांडण घरापावेतो आणु नको अशा छोट्या छोट्या शिकवणीतून माझी जडण-घडण होत गेली. आई नि काकू या माझ्यासाठी आज सुध्दा गुरुस्थानी आहेत.
घरची साधारण परिस्थिती असतांनाही माझं शिक्षण अकरावी (जुनी एसएससी) पर्यंत झाले. पहिली ते पाचवी नगरपालिकेच्या शाळेत (शाळा नं.2) येथे तर माध्यमिक शिक्षण पांडू बापू माळी म्यु.हायस्कुल शिरपूर येथे झाले. त्याकाळी असणार्या शिक्षकांचा आजही अभिमान वाटतो.त्यांचं विषयावर असलेलं प्रभुत्व, शिकवण्याची तळमळ आजही आठवते. आमच्या माध्यमिक शाळेचे मुख्याध्यापक अ.ज्ञा.पुराणिक होते. कडक शिस्तीचा माणूस. त्याच सोबत एम.डी.कुलकर्णी, पी.डी.पाटील, पाध्ये सर, जी.एस.कुलकर्णी, आर.एम.अग्रवाल, अ.म.भावसार, जी.एस.पाटील, ऐंडाईत सर या शिक्षकांची आठवण आजही आहे. माझ्या आजच्या कारकिर्दीसाठी या शिक्षकांचंही योगदान महत्वाचे आहे. खर्या अर्थाने ते माझे गुरु होते.विषयाच्या ज्ञानाबरोबर जीवन जगण्याचे धडे त्यांचेकडून मला मिळाले.आणि हो..माझे मित्र सुध्दा माझ्यासाठी गुरुस्थानी आहेत. चांगले मित्र, चांगली संगत सोबत मिळाली तर आयुष्याचं सोनं होते अस म्हणतात. असच सोन्यासारखे मित्र मला लाभले. माझी आर्थिक परिस्थिती डळमळीत असतांना सुध्दा त्यांनी मला कधी अंतर दिले नाही. माझा मित्र परिवार दांडगा असला तरी त्यात कैलासचंद्र बन्सीलाल अग्रवाल, गोपाल किसनलाल भंडारी, राजगोपाल चंदुलाल भंडारी,सुभाषभाई जैन,डॉ.सतिष राठी, जतीन जयेशचंद्र जैन, अॅड.एस.आर.सोनवणे, अल्ताफ शेख (हिना कटपीस),सुभाष जैन यांचे संपर्कात आहे. मित्रांनी शालेय जीवनात दिलेले प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सल्ले,चर्चा माझ्यासाठी शिकवणच होती. कैलासचंद्र अग्रवाल यांचेशी तर कौटूंबिक नाते जपलंय. माझ्या प्रत्येक सुख दु:खात कैलासचंद्र असतोच. शालेय जीवनात सांस्कृतिक कार्यक्रम, स्नेहसंमेलनात माझा नेहमी सहभाग असायाचा. विशेषत: नाटकात भाग घ्यायचो. यावेळीे वेशभुषेपासून इतर काही वस्तु लागे पावेतो सर्व मदत करायला कैलासचंद्र तयार असायचा. या माझ्या मित्रांनी जे माझ्यासाठी खूप केलंय आणि आजपावेतो ज्यांनीही सोबत केली ते माझे मित्रच झाले.आणि हे सर्व मित्र माझ्यासाठी गुरु आहेत.
माध्यमिक शिक्षणानंतर शिरपूरातील प्रसिध्द व्यापारी किसनलाल पन्नालाल भंडारी यांनी मला मुंबईला रेडियो टिव्ही दुरुस्ती शिक्षणासाठी फिलिप्स कंपनीत पाठवले. तेथुन आल्यानंतर मी हाच व्यवसाय सुरु केला. पुढे मित्र,माझा माळी समाज यांचे बळावर 1985 साली नगरसेवक पदासाठी उमेदवारी केली आणि जिंकलो सुध्दा. तेव्हापासून आज पावेतो मी नगरसेवक म्हणून माझ्या प्रभागाचा नगरसेवक प्रतिनिधी म्हणुन कायम आहे. यात माझ्या समाजाचा खुप मोठा वाटा आहे.ज्या माळी समाजात माझा जन्म झाला. त्या समाजाने,त्या समाजातील आबालवृध्दांनी मला राजकिय पाऊल वाटेवर नेहमीच यशस्वी केले तो समाज माझ्यासाठी गुरुस्थानी आहे असे मी मानतो.
त्याचबरोबर राजकिय पटलावर माझे गुरु आदरणीय अमरिशभाई पटेल (मा.शालेय शिक्षण मंत्री) आहे. त्यांच्या प्रेरणेने माझा राजकीय प्रवास अबाधित राहिला. लोकहितासाठी झटण्याची शिकवण त्यांचेकडून मिळाली. 1985 पासुन त्यांचे सोबत आहे. प्रत्येक कठीण परिस्थितीतून मार्ग काढण्याचं कौशल्य त्यांचेकडून शिकण्यास मिळालं. स्व.मुकेशभाई पटेल यांचेकडून धाडसाची शिकवण मिळाली. संकटे आली तरी सुबह देखा जायेगा अब सो जावो असं म्हणणार्या मुकेशभाईंनी भिती हा शब्द मनातून कायमचा काढून टाकायला मदत केली. अमरिशभाईंचे लहान बंधु भुपेशभाईंच्या जवळकीने मायेची ममता शिकवली. मृदु स्वभावाचे सुध्दा जग जिंकता येते याची प्रचिती आली. पटेल परिवाराशी कौटूंबिक नाते जुळले.अमरिशभाई स्व.मुकेशभाई, भुपेशभाई तीनही भाऊ माझ्यासाठी प्रेरणास्थान आहेत.
अमरिशभाईंच्या प्रेरणेने मला समाज विकासाची वाटचाल करणं सोपे झाले. नगरसेवक, नगराध्यक्ष, जिल्हा बँक संचालक, जिल्हा नियोजन मंडळ, रेल्वे बोर्ड,टेलिफोन बोर्ड, बहिणाबाई चौधरी विद्यापीठ (उमावि) येथे सिनेट सदस्य, मॅनेजमेंट कौन्सील मेंबर अशा विविध पदावर काम करण्याची संधी मिळाली. संपूर्ण महाराष्ट्रात शिक्षणक्षेत्रात अव्वल मानली जाणारी आर.सी.पटेल एज्यु.सोसायटी व ट्रस्ट यात सचिव म्हणून काम करण्याची प्रेरणा आदरणीय अमरिशभाईंनी प्रेरणा समाज विकासाच्या मार्गावर सतत चालत राहण्याचा ध्यास आ.अमरिशभाईंनी दिला.
माझ्या जीवनात येणार्या,सोबत असणार्या प्रत्येकाकडून जीवनाला आकार मिळाला.काही तरी शिकायला मिळले.प्रेरणा मिळाली,अशा सर्वांना नतमस्तक होऊन वंदन करतो.
मा.श्री. प्रभाकरराव चव्हाण
शिरपूर जि.धुळे
9422255474