समृद्ध शिक्षण संस्कारांसाठी...!

यू आर नॉट स्पेशल!

असा इकडे ये…आलास ! आता मुलांकडे तोंड करून उभा राहा !’सर सांगत होते आणि मी हसत हसत त्यांचे आदेश पाळत होतो.

अचानक सप्पदिशी आवाज झाला. सर्वांग बधीर झाले. थोड्या वेळाने जाणीव परतली तेव्हा माझ्या निळ्या हाफ पॅन्टखालच्या पोटरीवर हिरवागार वळ उमटला होता. सरांच्या हातातली बांबूची छडी (आमच्या भाषेत शेमटी) अद्याप लपलप करीत होती.

प्रचंड आगडोंब उसळलेला..पायावरचा वळ फारसा दुखत नव्हता. पण चिमुकल्या वयातला माझा चिमुरडा अहंकार मात्र ठसठसत होता. राहून राहून डोळे भरून येत होते. खुद्द माझ्यावर मार खाण्याची वेळ यावी ? हे बरं झालं नाही. अपनी इज्जत मिट्टी मे मिल गयी !

स्थळ-बनुमाय प्राथमिक विद्या मंदीर…वर्ग इयत्ता तिसरी…शिक्षक श्री प्रकाश पाटील सर…दुखावलेले पात्र अर्थातच मी…फटके खाण्याचे कारण- पाढे पाठ नसणे !

वडील मुख्याध्यापक असलेल्या शाळेत मी मार खावा या अपमानाने मी प्रचंड दुखावलो होतो. त्यापेक्षाही शिक्षकांनी मला मारले याचे वाईट अधिक वाटत होते. त्याचे मुख्य कारण म्हणजे मी तोपर्यंत कधीच मार खाल्लेला नव्हता. घरात ज्येष्ठ पुत्र असल्यामुळे सर्वांची उदंड माया मिळत होती. शाळेत मुख्याध्यापकांचा मुलगा म्हणून स्पेशल ट्रीटमेंट मिळत होती. अभ्यास केला नाही किंवा शाळेत उशिरा पोहचलो, कुणाची खोडी काढली, दंगामस्ती केली तरी कोणी रागावत नव्हते. त्यामुळे माझा अहंकार अधिकच कुरवाळला जाऊन वाढीस लागला होता. आणि अशा पार्श्वभूमीवर सरांनी समस्त विद्यार्थिवृंदासमोर मला फटकवावे, तेही यत्किंचित पाढे पाठ नसल्याच्या कारणावरून ! ही बाब मला झोपू देत नव्हती.

मी मग माझ्या परीने घडल्या घटनेचा सूड उगवण्याचा प्रयत्न करू लागलो. मी पाढे पाठ केले. त्यानंतर वडिलांना मी तिखटमीठ लावून वर्गातली घटना सांगितली. माझे पाढे पाठ आहेत, पण सरांनी मला मुद्दामच मारले. हवे तर तुम्ही माझे पाढे पाठ घ्या..अशी भुणभुण लावली. तीन दिवसांनी वडील वर्गावर आले. त्यांनी सरांना बाहेर बोलावले. माझ्या चेहर्‍यावर आनंद मावत नव्हता. आता वडील सरांची चंपी करणार तर ! मी बाकीच्या विद्यार्थ्यांकडे गर्वाने बघू लागलो. तेवढ्यात घात झाला. वडील आणि प्रकाश पाटील सर एकमेकांना टाळी देत मोठमोठ्याने हसू लागले. फसवणूक झाल्याच्या भावनेतून मी पुन्हा शोक सागरात बुडालो.

घरी आल्यावर मी चिडून पुन्हा तगादा सुरू केला. तुमच्या मुलाला मारणार्‍या शिक्षकांशी तुम्ही हसत कसे बोलू शकता वगैरे त्रागा केला. वडिलांनी प्रारंभी माझे बोलणे हसण्यावारी नेले. पण माझी पीरपीर वाढली तसे ते चिडले आणि म्हणाले,नेहमी लक्षात ठेव.. यू आर नॉट स्पेशल !

मला त्याचा अर्थ कळला नाही (त्यावेळी पाचवीच्या वर्गापासून इंग्रजी शिकवले जात असे). दुपारी वडील झोपल्यानंतर मी आईला विचारले, ते काय बोलले नेमके ?

आईच ती…मायेच्या ममतेने म्हणाली, त्यांचं मनावर घेऊ नकोस, जा अभ्यास कर !

आमच्यातला सुप्त संघर्ष (माझ्या मते) आठवडाभर सुरू होता. एके दिवशी वडिलांनी मला आणि सरांना सोबत ऑफिसमध्ये बोलावून घेतले. चहा मागवला (त्या दोघांसाठी). त्यांच्या टेबलवर पृथ्वीची गोलाकार प्रतिकृती होती. काही सेकंद तो गोळा फिरवून त्यांनी मला जवळ बोलावले. भारताचे स्थान दाखवून त्यांनी विचारले, यात महाराष्ट्र कुठे दिसतोय ? मी महत्प्रयासाने महाराष्ट्र शोधून दाखवला. त्यांनी पुन्हा विचारले, आपला जिल्हा दिसतोय ? मी नाही म्हटलो.

मग शिरपूर…अजिबात नाही..

मला एका बाजूला सरकवत ते म्हणाले, ’या जगाच्या पसार्‍यात भारत एव्हढासा, त्यात महाराष्ट्र इतकासा…तिथे या शाळेचा हेडमास्तर कुठे नी त्याचा मुलगा कुठे ? तू कोणीतरी वेगळा आहेस हे खूळ डोक्यातून काढून टाक. तू चुकशील तर शिक्षा होईलच हे लक्षात घे.’

मी जे समजायचे ते समजलो. त्यावेळी अगदी पोरका झाल्यासारखे वाटले खरे पण पुढील आयुष्यात आपण काहीतरी स्पेशल आहोत हा दंभ कधीच मनाला शिवला नाही. त्यामुळे ओळ्खदेख असेल तरी सर्वसामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभा राहून काम करून घेणे अधिक पसंत करतो. अहंकार ही किती फालतू बाब आहे ते पावलोपावली दिसते आणि आपल्यात रुजू पाहणारी अहंकाराची विषवल्ली वेळीच छाटली गेली याचे समाधान वाटते. प्रकाश पाटील सरांची ती छडी आणि वडिलांनी घालून दिलेले उदाहरण आजही पाय जमिनीवर ठेवण्यास कारणीभूत ठरली आहेत. यू आर नॉट स्पेशल ही जाणीव वेळीच करून देत मला भरकटत जाण्यापासून वाचवल्याबद्दल त्या दोघांचे ऋण न फिटणारे आहे.

 

 

श्री. सचिन पाटील,

शिरपूर जि. धुळे (9850574099)

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Email
Print