माझी वाचन प्रेरणा
माझे बालपण पिंपळनेर सारख्या ग्रामीण परंतु सांस्कृतिकदृष्ट्या समृद्ध असणार्या गावात गेले . वाचनाचा वारसा आमच्या वडिलांकडून माझ्यापर्यंत आला .आमचे वडील कैलासवासी मोतीराम संपत चौधरी हे स्वातंत्र्यसैनिक होते . हौशी रंगभूमीवरील कलावंत होते .पौराणिक नाटकातील स्त्री पात्रे प्रामुख्याने ते वठवित असत . त्यांचे पाठांतर उत्तम होते . आणि स्मरणशक्ती तेज होती . यामुळे ते सातत्याने वाचन करीत असत .त्यांच्या वाचनात पौराणिक ग्रंथ आणि स्वातंत्र्य सैनिकांची माहिती असलेले ग्रंथ यांचा समावेश असे .त्यांच्या या वाचन तपस्येचा निश्चितच वसा आणि वारसा मला लाभला . त्यातून वाचनाची गोडी वाढत गेली . सुदैवाने पिंपळनेर येथे लोकमान्य टिळक सार्वजनिक ग्रंथालय आहे .ते फार जुने ग्रंथालय आहे . महात्मा गांधीजींनी सुद्धा त्या ग्रंथालयाला भेट देऊन आपल्या हस्ताक्षरात तिथे अभिप्राय नोंदवला आहे .अशा ग्रंथालयात माझी तब्बल दहा वर्षे गेली .रोज सायंकाळी या वाचनालयात मी जात असे . त्याकाळी प्रारंभी जादूचा राक्षस , जादूची छडी यांसारखी बाल वाड्:मयाची पुस्तके मी खूप वाचली आहेत .राजा राणीच्या कथा वाचल्या आहेत .रामायण महाभारताच्या कथा वाचल्या आहेत . त्यावेळी कॉमिक्स हा प्रकार नव्यानेच सुरू झाला होता .कॉमिक्स वाड्मयाचा नायक टारझन होता . तो जंगलात राहत होता . विविध करामती करत होता .ते वाचून टारझन हा आमचा नायक त्या काळी बनला होता . वाढत्या वयानुसार थोडी समज आल्यानंतर मग मी वर्तमानपत्रे वाचू लागलो . त्यातील अग्रलेख वाचू लागलो .या वाचनाने पुढे मला लेखनाला प्रेरणा लाभली .नंतरच्या काळात आज पावेतो माझ्या हातून अनेक समीक्षा ग्रंथांचे , कथाकवितांचे लेखन झाले . याची बीजे पिंपळनेरच्या सार्वजनिक वाचनालयात वाचलेले वर्तमानपत्र ,मासिके यांच्या वाचनात आहेत .दैनिक केसरी आणि दैनिक गावकरी हे पेपर आवर्जून वाचत असे .दैनिक केसरी मधून राज्याच्या ,देशाच्या तर दैनिक गांवकरी मधून प्रादेशिक स्तरावरच्या घडामोडी कळायच्या .त्या काळातील लोकांचा दैनिक गांवकरीवर खूप विश्वास होता . एखादी गोष्ट छातीठोकपणे सांगायची असेल तर गावकरी मध्ये असं छापून आलेय अशा पद्धतीने संभाषणाचा प्रारंभ त्याकाळी होत होता . दैनिक वर्तमानपत्रांसोबतच आमच्या बालपणी चांदोबा हे सचित्र मासिक येत असे .तेही आम्ही मुलं आवडीने वाचत असू .आमच्या बाल मनाला अद्भुतरम्यतेचे जे आकर्षण होते त्याची पूर्तता चांदोबा ने त्या काळी केलेली होती .याच काळात साने गुरुजींच्या गोड गोष्टी श्यामची आई ही पुस्तके आम्ही वाचली .ग्रंथालयातील वाचनासोबतच आमच्या पिंपळनेरच्या तत्कालीन विद्यानंद हायस्कूलमध्ये वाचनाची चांगली सोय होती . आठवड्यातून एक दिवस वाचनाचा तास असायचा . या तासाला आमचे शिक्षक एक पेटी आणायचे .त्या पेटीत बाल वाययाची पुस्तके असायची प्रत्येक मुलाला एक पुस्तक वाटलं जायचं . तो संपूर्ण तास आम्ही वाचन करत असू .अशा पद्धतीचे वाचन संस्कार बालपणी माझ्यावर झाल्याने नंतरच्या काळात लेखक म्हणून जी काही कामगिरी करता आली त्याचं सर्व श्रेय पिंपळनेरच्या भूमीमध्ये केलेल्या वाचनालाच जाते. यासोबतच किशोर वयामध्ये आम्ही हिंदी उपन्यास हे देखील खूप वाचलेले आहेत .गुलशन नंदा आणि राणू यांचे हिंदी उपन्यास मोठ्या प्रमाणावर आम्ही त्या काळात वाचले आहेत .अशा रीतीने वाचनाचा श्री गणेशा झाला . बालभारतीचे पुस्तक असो की इतिहासाचे असो हातात पडल्याबरोबर पहिल्याच दिवशी ते वाचून पूर्ण होत असे .यामुळे वर्षभर शिक्षक त्यातील धडा शिकवीत तेव्हा वाचलेले हे सगळे आठवे आणि आमच्या धारणा पक्क्या होत .यातूनच मराठी , इतिहास यां सारख्या विषयात मला नेहमीच चांगले गुण मिळत गेले . वाचनानेच सर्वांगीण श्रीमंती साध्य होते हे वारंवार सिद्ध होत गेले . महाविद्यालयीन जीवनात अभ्यासाच्या निमित्ताने वास्तववादी साहित्य , अस्तित्ववादी साहित्य ,अति वास्तववादी साहित्य , सौंदर्यवादी साहित्य , दलित व ग्रामीण साहित्य , मार्क्सवादी साहित्य अशा विविध साहित्य प्रवाहांचा परिचय झाला .वाड्:मयाचे सर्व खंड वाचून काढले .पुढे प्राध्यापक झाल्यानंतर विद्यार्थ्यांना शिकविण्याच्या निमित्ताने सर्व संदर्भग्रंथ सर्व , क्रमिक ग्रंथ यांचे वाचन केले . वाचन करताना एक शिस्त स्वतःला लावून घेतली. एकच एक वाड्:मय प्रकार पूर्ण वाचून टाकायचा. एकाच लेखकाची सगळी पुस्तके वाचून टाकायची. यामुळे एक समग्र लेखक कळतो आणि एखादा विशिष्ट वाड्:मय प्रकार संपूर्णपणे कळण्यास मदत होते . इयत्ता अकरावी पर्यंतच हजारो पुस्तकं माझी वाचून झालेली होती .पुढे समीक्षा लेखनाच्या निमित्ताने अनेक समीक्षा ग्रंथ वाचले .समीक्षेची मुळाक्षरे जाणून घेतली .यामुळे नंतरच्या काळात काही समीक्षा ग्रंथांचे लेखन माझ्याकडून होऊ शकले . आजवर जी काही लेखन संपदा निर्माण करू शकलो या सर्वांमागे आजपर्यंत केलेली वाचन तपस्या आहे हे निश्चित पणाने सांगता येते . तारुण्यात साधारणपणे विनोदी वाचन करू नये असे माझे मत आहे . तारुण्यात ध्येयवादी गंभीर प्रवृत्तीचे , वैचारिक अशा पद्धतीचे वाचन केले पाहिजे .त्यातून दिशा प्राप्त होते . वाड्मयीन जाणिवेच्या कक्षा रुंदावतात . विनोदी वाचन हे आयुष्याच्या नंतरच्या टप्प्यात केले पाहिजे . शास्त्रीय स्वरूपाचे ग्रंथ ,विज्ञान साहित्य यांसारख्या प्रांतातही वाचन मुशाफिरी वाचकांनी केली पाहिजे .सर्व प्रकारचे वाचन केलं पाहिजे .विद्यार्थी वर्गाने विशेषतः शब्दकोश वाचले पाहिजेत .व्याकरण वाचले पाहिजे .अभ्यासले पाहिजे . उत्तम उत्तम ग्रंथ वाचले पाहिजे .पदव्युत्तर वर्गाच्या विद्यार्थ्यांनी अनुवादित साहित्य वाचले पाहिजे . ज्यामुळे विश्व साहित्याची त्यांना ओळख होईल .
– प्रा.डाॅ.फुला बागुल
शिरपूर -धुळे