समृद्ध शिक्षण संस्कारांसाठी...!

माझी वाचन प्रक्रिया

माझी वाचन प्रक्रिया

मी सध्या काय वाचतो ? मी कधी वाचतो ? कुणाचे वाचतो ? जे काही वाचतो ते नेमके कसे वाचतो ? वाचताना काय काय करतो ? वाचल्यावर काय करतो? असे काही प्रश्न माझ्याविषयी एक लेखक म्हणून पडत असतात . आपलं पुस्तक या लेखकाने वाचले पाहिजे म्हणून मग अनेक नवोदित वा मान्यवर लेखकही प्रत्यक्ष भेटीत वा पोस्टाने – कुरिअरने पुस्तके पाठवत असतात . मीही माझ्या उमेदीच्या काळात हेच केले . त्यात गैर असे काही नाही . आपले पुस्तक दिल्यावर – पाठविल्यावर नेमके वाचले गेले की नाही याचीही उत्सुकता असते . त्या उत्सुकतेपोटी मी मोबाइल -फ़ोन नव्हता त्या काळात पोस्टाने रिव्ह्यू घ्यायचो . माझी ‘वारुळ’ ही कादंबरी 2004 मध्ये साकेत प्रकाशन ,औरंगाबाद यांनी काढली होती . तिच्या प्रती अनेक मान्यवरांना मी पाठविल्या होत्या . त्यावेळी माझ्याकडे टेबल फ़ोन उपलब्ध होता . त्यामुळे त्यातल्या काही जणांशी फ़ोनवरून संपर्क करू लागलो . त्यात एका मान्यवराने असे झापले की माझी लेखक असण्यातली नशाच उतरली . तरीही नंतरच्या काळात प्रकाशित होऊन आलेली पुस्तके पाठवतच होतो . पण रिव्ह्यू घेत नव्हतो . वाचावेसे वाटले तर वाचा . अन्यथा तुमच्या संग्रही असू द्या . तुम्हीच तुमची पुस्तके हाताळताना माझं पुस्तक कधी हातात आले तर माझी लेखक म्हणून आठवण येईल तेवढी मला पुरेशी होती . अलीकडे मात्र मी कोणालाच पुस्तके पाठवत नाही . कारण तो उत्साह आता माझ्यात बाकी उरला नाही .
माझ्याकडे येणार्‍या पुस्तकांची संख्या माझ्या मानाने मोठीच आहे .त्यात कथा ,कविता ,कादंबर्‍या,चरित्रे ,आत्मचरित्रे, ललित असे सर्व प्रकार असतात . ती सगळी वाचणे मला कधीच शक्य होत नाही . तरी त्यातली निवडक आणि त्यातल्या त्यात जे नवोदित पण त्यांच्या माझ्याकडे आलेल्या पुस्तकाची मला वाटलेली उपयुक्तता.प्रतवारी विचारात घेऊन मी अशी पुस्तकं वाचतो .वाचताना एका हातात शस्त्र म्हणून पेन असतो . मला आवडलेल्या , खटकलेल्या अशा गोष्टींवर खुणा करून त्यांच्या वेगळ्या नोंदी त्याच पुस्तकाच्या शेवटी दिलेल्या कोर्‍या पानांवर, पाने दिली नसतील तर मलपृष्ठांवर किंवा पुस्तकात जेथे कोठे कोरी जागा असेल तेथे लिहितो . अगदी कोठेच जागा नसेल तर वेगळा कोरा कागद घेतो . त्यावर लिहितो . पण लिहितोच . हे सगळं लिहिलेलं नंतर मला त्या पुस्तकाचे परीक्षण लिहिताना उपयोगी पडते . पुस्तकात मी केलेल्या खाणाखुणा आणि मी केलेले वेगळे लेखन यांमुळे त्या पुस्तकाचे रूप विद्रूप होते . पण माझा त्याला इलाज नसतो . अलीकडेच रश्मी पडवाड मदनकर यांच्या ‘पद्मकोश’या पुस्तकावर अशाच खाणाखुणा करून त्या पुस्तकाचा कोरेपणाचा खूनच केला . त्यावर विस्तृत असे पंधरा पेजेस परीक्षण लिहिले . त्यांना फ़ोनवर बोलताना म्हणालो ,‘रश्मी’तुझ्या पुस्तकाचे मी जे हाल केले ते पाहून तुला अक्षरशः रडू येईल .’ त्यावर त्या म्हणाल्या ,‘नाना’ मला ते पुस्तक हवे आहे . त्याऐवजी मी तुम्हाला दुसरी प्रत देते .कारण तो माझ्यासाठी अनमोल ठेवा असेल . हा अनुभव मला खूपच मोलाचा वाटला . मी जी जी पुस्तके वाचतो त्या त्या पुस्तकांचे कमीअधीक प्रमाणात असेच हालहाल करतो . त्यादृष्टीने मी एक क्रूर वाचक आहे . या लेखासाठी सध्या मी जे पुस्तक वाचत आहे युवराज माने यांचे ‘ गुरूजी , तू मला आवडलास !’ या पुस्तकाचेही मी तेच हाल केले आहेत .
मित्रहो , वर मी म्हटले की मला एका मान्यवराने झापले . अगदी तसेच एक पुस्तक पाठविणार्‍या लेखकानेही मला चांगलेच झापले . त्याचे असे झाले – साधारणतः माझ्या संदर्भात ज्या काही गोष्टी नित्यशः घडतात त्या मी निःसंकोचपणे पोस्ट करून ़फेसबुकवर टाकतो . मागच्या काही महिन्यांआधी मी अशाच मला अभिप्राय द्यायला प्राप्त झालेल्या पुस्तकांसंबंधाने एक पोस्ट टाकली होती . तिचा विषय होता -माझ्याकडे आलेल्या पुस्तकांपैकी मी सध्य स्थितीत एकही पुस्तक वाचू शकत नाही. याचे कारण माझे ‘आक्करबोट्या’ या कादंबरीचे लॅपटॉपने वाचन सुरू आहे . सध्या ती कादंबरी लॅपटापून पूर्ण झाली .तिचे दुसरे वाचन करणे बाकी आहे . मध्ये सध्या जो वेळ मिळत आहे त्यात काही पुस्तके वाचायची असे मी ठरविले आहे . मी कादंबरी लॅपटॉपताना का वाचत नाही ? कारण कादंबरीची जी तंद्री लागते ती तंद्री कायम ठेवायची असेल तर मग असे तिला विचलित करणारे वाचन करू नये असे माझे स्पष्ट मत आहे .त्या माझ्या पोस्टवर अनेकांनी सकारात्मक अन चार दोन जणांनी नकारात्मक कॉमेंट केल्या . त्यातली एक मला झापणारी होती . तिचा आशय होता , ‘ मी तुम्हाला माझी जी कादंबरी वाचायला पाठविली ती कशी आहे हे तुम्हाला माहित आहे? तिच्यावर आतापर्यंत सातजणांनी पीएच. डी . प्राप्त केल्या आहेत .आणि ती कादंबरी तुम्ही वाचत नाही? ’ मी त्या लेखकावर खरंच अन्याय केला असे मला वाटले . अन मी नम्रपणे त्यांना म्हणालो , ‘माझे कादंबरी लेखन संपेपर्यंत तरी मी तुमची कादंबरी वाचू शकत नाही . तुम्ही म्हणाल तर ती मी तुमच्याकडे स्वखर्चाने परत पाठवू शकतो.’ आणि त्यांनी पाठवा म्हटल्यावर मी ती पाठविली . हा अनुभव माझ्यासाठी अत्यंत दुर्मिळ होता .काहीना त्यांच्या येऊ घातलेल्या पुस्तकावर प्रस्तावना वा पाठराखण हवी असते . तेही देताना माझी ़फुरसद किती हे ठरवूनच देतो . एकाने तोही नवोदितच माझ्याकडून प्रस्तावना लिहून घेतली . अन ऐन वेळेवर दुसर्‍याचीची छापली . मला त्याबद्दल अजूनही काही बोलला नाही . उलट संपर्क तोडला . असे झाले तेव्हा आमच्या एका मित्राच्या अनुभवाची आठवण येते . त्यांनी त्यांच्या वडिलांच्या काव्यात्म हस्तलिखितावर एका दिग्गज अतिज्येष्ठ लेखकाला प्रस्तावना मागितली . तेव्हा त्यांनी ‘ हस्तलिखितासोबत पाच हजार रुपयांचा चेक पाठवा ‘ असे म्हटले होते . आपण तसे करू शकणार नाही. कारण आपण त्या नाव मोठे लक्षण खोटे या प्रकारात मोडत नाही .
मी दोन पद्धतीने वाचन करतो . जेव्हा कादंबरीसारखे मोठे लेखन हाताशी नसते तेव्हा मी आतापर्यंत वाचायचे राहून गेलेल्या किंवा माझ्याकडे येणार्‍या पुस्तकांतून जास्तीत जास्त नवोदितांची पुस्तके वाचतो . वाटल्यास त्यावर परीक्षण लिहितो . ़फेसबुकवर टाकतो . संबंधित लेखकाला पाठवितो. कारण त्या लेखकाची ते ़फेसबुकवर ना येता कुठे नियत -अनियतकालिकात यावे अशी इच्छा असते . मी स्वतःहून कुठल्याही नियत -अनियतकालिकाला ते लेख पाठवित नाही . कधी कधी संबंधित लेखक पाठवितात. कधी ते छापून आल्यावर ना संपादक अंक पाठवितात ,ना संबंधित लेखक कळवित . दुसर्‍या प्रकारचे वाचन माझ्या गरजेतून निर्माण झालेले असते . मी जेव्हा एखादी कादंबरी लिहितो ती लिहिताना किंवा लिहण्यापूर्वी मला काही गोष्टी माहिती असायला हव्या असे वाट्ते . तेव्हा त्या मिळविण्यासाठी मी संबंधित ग्रंथ वाशीम येथील वाकाटक या जुन्या लायब्ररीतून मिळवून वाचत असे . त्याच्या नोंदीही घेत असे . आता अन्ड्रॉईड आला तेव्हापासून तीही गरज फ़ार सोपी झाली . नेटवर पटकन शोधता येते .

बाबाराव मुसळे
-9325044210

Facebook
Twitter
LinkedIn
WhatsApp
Email
Print