- – सौ. विजया कैलास हिरेमठ —
पुस्तक परीक्षण
पुस्तकाचे नाव-गुरुजी,तू मला आवडला.
लेखक – युवराज माने
प्रकाशन- दिलीपराज प्रकाशन,पुणे
मूल्य- २८०₹
शिक्षणाची गगनचुंबी इमारत उभी करण्यासाठी सर्वप्रथम त्या इमारतीचा पायाच मजबूत असणं महत्वाचं आहे. मुलांच्या प्राथमिक शिक्षणाच्या भक्कम पायावरच त्यांची शैक्षणिकच नव्हे तर यशस्वी आयुष्याची इमारत उभी केली जाते.जन्माला येताना जशी बाळाची आईशी नाळ जोडलेली असते अगदी तशीच मुलाच्या शिक्षणाची नाळ त्याच्या शिक्षकांशी जोडलेली असते.बाळाच्या जन्माच्या वेळी त्याची नाळ आईपासून अलगद,हळूवारपणे विलग केली जाते,त्याप्रमाणे मुलांच्या भावनांना धक्का लागू न देता त्यांची शिक्षणाची नाळ हळुवार जोडता आली तर शिक्षणासोबतच मुलांचा प्रवास हा नक्कीच सुखकर ,आनंददायी व चिरंतर टीकणारा ठरेल.
‘गुरुजी,तू मला आवडला’ पुस्तकाच्या या नावातच हे पुस्तक म्हणजे लाडक्या गुरुजींच्यासोबत शिक्षण प्रवास आरंभलेल्या लेकरांच्या आनंददायी शिक्षणाचा सोहळाच असावा असं वाटलं. लेकरांकडूनच गुरुजींना तू मला आवडला अशी मायेची पोचपावती मिळणं म्हणजे खरंच एक शिक्षक म्हणून लेखक युवराज माने यांचा हा मोठा सन्मानच आहे.एका शिक्षकाने आपल्या विद्यार्थ्यांसोबत अनुभवलेला प्राथमिक शिक्षणाचा आनंदमेळा ,एक लेखक म्हणून मनात टिपून ठेवला आणि त्याच शिक्षणाचा सोहळा आपल्या पुस्तकाच्या माध्यमातून अतिशय सुंदर शब्दांत मांडला आहे.
मुलं प्रथमच शाळेत येताना बावरतात,घाबरतात. त्यांना घरातील सुरक्षित वातावरणातून शाळेच्या अनोळख्या वातावरणात रमण्यासाठी आपलंसं काही आणि आपलंसं कोणी जवळ हवं असतं.आणि नेमकी हीच भूमिका युवराज माने सरांनी अतिशय चोख बजावली आहे. घरात जशी आई असते तसेच शाळेत शिक्षक आईची जागा भरून काढणारे असतील तर मुलांना शाळेत आनंदाने रुळायला वेळ लागत नाहीच. मुलं,घर,शाळा ,आजूबाजूचा परिसर यांना एका नाजूकश्या पण तितक्याच घट्टपणे बांधल्याचे जाणवते.
शिक्षण म्हणजे केवळ पुस्तकी ज्ञान संपादन करणे नसून अनुभवातून,आजूबाजूला घडणाऱ्या घटनांतून मुलांच्याही नकळत देता येईल असा एक ठेवाच.मुलांना लहान वयात आपण जितके जास्तीत जास्त नवनवीन अनुभव देऊ तितकी त्यांची मेंदूची वाढ चांगली होते असे तज्ञ लोकांचे म्हणणे आहे.आणि हेच वेगवेगळे अनुभव युवराज माने सरांनी आपल्या शाळेतील मुलांना देऊन मुलांना शिक्षण प्रवाहात कसे घडवले व स्वतः एक शिक्षक म्हणून त्यातून कसे घडतं गेले.याचंच वर्णन सहज,सुंदर,सोप्प्या भाषेत आपल्या ‘गुरुजी,तू मला आवडला’ या पुस्तकातून आपल्या भेटीस आणलं आहे.लेखकांनी या पुस्तकात तब्बल 70 पेक्षा जास्त लेखातून स्वतःचे अनुभव अतिशय मोजक्या पण प्रभावी भाषा शैलीतून आपल्यासमोर मांडले आहेत.या पुस्तकांत लिहलेला प्रत्येक उपक्रम त्यांच्या शाळेतील मुले,त्यांच्या गरजा,आवडी-निवडी लक्ष्यात घेऊन मुलांना सहज,आनंददायी शिक्षणाची अनुभूती देणारा असून प्रायोगिक तत्त्वावर हे उपक्रम राबवताना शिक्षक स्वतःच माझ्या मुलांनी मला घडवलं हे मोठ्या मनाने मान्य करतात याचे विशेष कौतुक वाटले.’शिक्षक विद्यार्थी घडवतो असे म्हणतात पण इथं तर विद्यार्थ्यांनी एक शिक्षक घडवला. एक आनंदाची डहाळी बनू इच्छिणाऱ्या शिक्षकाला या आनंदाच्या झाडाने ती संधी दिली आणि मग माने सरांसारखा उत्साही ,प्रयोगशील ,संवेदनशीलशिक्षकाच्या आनंदाच्या डहाळीवर मनसोक्त झुलण्याचे, शिकण्याचे भाग्य या पाड्यावरील लेकरांना लाभलं.शाळा म्हणजे बंदीवास नसून इथेही मज्जा आहे की हा विश्वास मुलांना मिळाला आणि मग हे आनंदाचं झाड कसं कसं बहारायला लागलं याचं सुरेख वर्णन लेखकांनी या पुस्तकांत केले आहे.मला तर पुस्तक वाचताना असं वाटलं की कोणतंही पान काढावं,कुठूनही सुरवात करावी आणि आलिबाबाच्या गुहेप्रमाणे या पुस्तकाच्या प्रत्येक पानांतून मुलांच्या हसत खेळत शिक्षणाच्या खजान्यापर्यंत पोहचता येत.
कधी खेळातून, कधी चित्रातून,कधी घरातील टाकाऊ वस्तूंच्या माध्यमातून,कधी आपल्याच घरातील आजी- आजोबा,आई-बाबा, पाळीव प्राणी,निसर्गाच्या सानिध्यात राहून झाडे,वेली, पशुपक्ष्यांच्या सोबतीतुन मुलांचे शिक्षण कसे सुरू करता येते याचा राजपथच लेखकाने पुस्तकातुन सर्वांसाठी रेखिला आहे,खुला केला आहे.
मुलांच्या भावना,अपेक्षा ,इच्छा ,हट्ट या साऱ्यांचा आदर करत एक शिक्षक मुलांशी कसं अतूट प्रेमाचं नातं जोडू शकतो,याचे अनेक दाखले पुस्तकातील अनेक प्रसंगातून डोळ्यासमोर जसेच्या तसे उभे राहतात. पुस्तकातून आपल्यालाही अनेक व्यक्तिरेखा,अनेक झाडे-वेली,पशु-पक्षी,कीटक,विविध प्रकारचे ममनोरंजक खेळ,खेळाची मुलांनी स्वतःच्या हाताने बनवलेली साधने यांची ओळख तर होतेच शिवाय आपण या मुलांच्या विश्वात असे काही रममाण होऊन आपल्याच बालपणात हरवून जातो की पुस्तक खाली ठेवायची इच्छाच होतं नाही.पाठय पुस्तकातील अध्यापनासोबतच व्यावहारिक ज्ञानाचे,भावनिक व काल्पनिक विश्वाचे भांडार मुलांसाठी खुले करताना सरांनी केलेल्या अनेक प्रयोगांचे कौतुक करावे तितके थोडेच आहे.निसर्गाच्या सानिध्यात मुलांचे कुतूहल जागृत करत आणि तितक्याच सक्षमतेने त्यांच्या अनेक प्रश्नांची उत्तरे शोधून काढण्यासाठी माने सरांनी केलेले प्रयोग आणि मुलांना शिक्षण प्रवासात टिकून राहण्यासाठी वारंवार दिलेले प्रोत्साहन यातून संकलित झालेल्या अनुभवांची शिदोरी म्हणजे ‘गुरुजी,तू मला आवडला’ हे पुस्तक…
शंख,शिंपले, दगड, गोटे,पानं-फुलं, बिया यांच्या माध्यमातून शिक्षण ,चित्रातून मुलांचे कल्पना विश्व उलगडू पाहणे,बी रुजण्यापासून झाड उगवेपर्यंतचा प्रवास पुस्तकातील चित्रातून शिकवण्यापेक्षा प्रत्यक्ष कृती आणि निरीक्षणातून मुलांना या शिक्षणाची अविस्मरणीय अनुभूती देणे आणि त्यातून निर्माण होणाऱ्या मुलांच्या भावमुद्रा टिपून त्याचंही संकलन करण्याचे गोड अनुभव लेखकाने रंजकपणे नमूद केले आहेत.
मराठी,गणित, विज्ञान किंवा इंग्रजी असो प्रत्येक विषय शिकवताना केलेले अनेक प्रयोग तसेच मुलांना वाचन -लेखनाची गोडी लागावी म्हणून राबवलेले उपक्रम असो किंवा समानता,एकता, आपुलकी,प्रेम,जिव्हाळा या भावनांची पेरणी करण्याचे उपक्रम असो लेखकाने विविधांगी अश्या सगळ्याच आवश्यक कृती आणि अनुभव सगळंच शब्दबद्ध केले आहे.
सोबतच मा.भाऊ गावंडे या प्रतिभावंत व्यक्तिमत्वाची लाभलेली प्रस्तावना पुस्तकाच महत्व अधोरेखित करते.मुलांसाठी व पालकांना सतत जागृत ठेवणारे मासिक म्हणजे ‘वयम’! या मासिकेच्या संपादिका मा.शुभदा चोकर यांनी पुस्तकाची केलेली पाठराखण म्हणजे एका संपादकांची दूरदृष्टीचं…!
जितक्या सहज पण उत्साहात माने सरांनी हे सारे प्रयोग ,उपक्रम शाळेत राबवले तितक्याच चिकित्सक आणि चिकाटीने त्याच्या नोंदी ठेवून तयार केलेला प्राथमिक शिक्षणासाठीचा अमूल्य दस्तऐवज या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्या भेटीस आणला आहे. पूर्वीपासून सहज आणि ओघवतेपणाने होणारे प्राथमिक शिक्षणच सध्य स्थितीला महत्वाचे,चिंतेचे आणि कठीण काम बनले आहे. मुलं ऐकतच नाहीत असा समाजात सूर उमटत असताना “मुलाचं शिकणं ही औपचारिकता नसून तो एक आनंदाचा सोहळा असतो” असं जर एखादा शिक्षक ठामपणे म्हणत असेल आणि आपल्या कृतीतून ते सिद्ध करून दाखवत असेल तर हा सोहळा आपल्या मुलांनीही आनंदाने अनुभवावा असं एक पालक,एक शिक्षक म्हणून मनापासून वाटतंच ना??म्हणूनच प्रत्येक शिक्षकासच नव्हे तर जगाच्या विशाल शाळेत मुलाला घडवण्याची इच्छा बाळगणाऱ्या प्रत्येक पालकांसाठीही अतिशय मार्गदर्शक असे हे पुस्तक सर्वांनी वाचायलाच हवे असे मला मनापासून वाटते. इतके सुंदर ,मार्गदर्शक पुस्तक आमच्या भेटीस आणल्याबद्दल लेखक युवराज माने सर यांचे मनापासून आभार आणि त्यांच्या पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा…
सौ. विजया कैलास हिरेमठ.
सांगली-9511762351
( विजया हिरेमठ या सांगली येथे मुलांसाठी वाचन कट्टे चालवतात, वाचनप्रेमी वाचनालय चालवतात,संवादिनी या त्याच्या महिलांच्या ग्रुपद्वारे समाजप्रबोधन करतात.त्या उत्तम लिहितात व एक उत्तम वाचक आहेत.)